४३ लाखांच्या एमडीसह दोघे जेरबंद; अखेर न्यायालयाकडून १० वर्षांची सक्तमजुरी!
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबईत अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात गुन्हे शाखेच्या कक्ष-१० ने केलेल्या कारवाईला मोठे यश मिळाले आहे. ४३ लाख रुपये किमतीचे तब्बल १६० ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) जप्त करण्यात आलेल्या प्रकरणात दोन आरोपींना मुंबईतील विशेष सत्र न्यायालयाने १० वर्षांची सक्तमजुरी आणि प्रत्येकी १ लाख रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास अतिरिक्त एक वर्षाच्या साध्या कारावासाची शिक्षाही सुनावण्यात आली आहे.
गुप्त माहिती... छापा... आणि ४३ लाखांचा एमडी!
२८ मार्च २०२४ रोजी गुन्हे शाखेच्या कक्ष-१० ला अंमली पदार्थांच्या तस्करीबाबत गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने ओशिवरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत छापा टाकला.
या कारवाईत आकाश अनिल सिंग (२६) याच्याकडून ५५ ग्रॅम एमडी, तर भवन हयातसिंग अधिकारी (४०) याच्याकडून १०५ ग्रॅम एमडी जप्त करण्यात आला. दोघांकडून मिळून १६० ग्रॅम मेफेड्रोन, अंदाजे ४३ लाख रुपये किमतीचे, जप्त करण्यात आले.
पोलिसांच्या तपासानुसार, हा अंमली पदार्थ वाहतूक, विक्री आणि व्यापाराच्या उद्देशाने बेकायदेशीररीत्या ताब्यात ठेवण्यात आला होता.
शास्त्रोक्त आणि तांत्रिक तपासातून पुरावे गोळा
या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक मनोज सुतार यांनी केला. त्यांच्या अधिपत्याखालील तपास पथकाने उपलब्ध पुरावे, गुन्ह्याची कागदपत्रे, साक्षीदारांचे जबाब तसेच इतर महत्त्वाच्या बाबींचे संकलन करून तपास पूर्ण केला. त्यानंतर आरोपींविरोधात मुंबईतील विशेष सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
खटल्याच्या सुनावणीदरम्यान तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक मनोज सुतार, सह तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज चौधरी (कक्ष-५) आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश तोडकर यांनी तपासाशी संबंधित कार्यवाही केली.
तर न्यायालयीन कामकाजात पैरवी अधिकारी मसपोनि. यादव, सफौ. ३०६१२/शेख आणि मपोअं. ९१२११०/खाडे यांनी प्रकरणाची बाजू प्रभावीपणे मांडण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली.
दोन्ही आरोपींना १० वर्षांची शिक्षा
या तपासात उपलब्ध झालेल्या पुराव्यांच्या आधारे मुंबईतील विशेष सत्र न्यायालयाने ३१ ऑगस्ट २०२६ रोजी दोन्ही आरोपींना १० वर्षांची सक्तमजुरी सुनावली. यासोबतच प्रत्येकी १ लाख रुपये दंड ठोठावण्यात आला असून दंड न भरल्यास एक वर्षाचा साधा कारावास भोगावा लागणार आहे.
या प्रकरणी कलम ८(क), २२(क) आणि २९, एनडीपीएस कायदा १९८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
कारवाईमागे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन
ही संपूर्ण कारवाई मा. पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई श्री. देवेन भारती, मा. पोलीस सह आयुक्त (गुन्हे) श्री. अनिल कुंभारे, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. कृष्णकांत उपाध्याय, मा. पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण-१) श्री. नवनाथ ढवळे आणि मा. सहा. पोलीस आयुक्त (डी. पश्चिम) श्री. धर्मपाल बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या कारवाईत कक्ष-१० चे प्रभारी पोलीस निरीक्षक विशाल राजे, पोलीस निरीक्षक मनोज सुतार (तत्कालीन नेमणूक कक्ष-१०), सहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज चौधरी (कक्ष-५), महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक पुनम यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश तोडकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अहमद शेख (कोर्ट कारकून, सत्र न्यायालय) आणि महिला पोलीस शिपाई क्रमांक ९१२११०/खाडे (कोर्ट कारकून, सत्र न्यायालय) यांनी भूमिका बजावली.
४३ लाखांच्या एमडी तस्करीचा तपास, न्यायालयात पुराव्यांची प्रभावी मांडणी आणि अखेर दोन्ही आरोपींना १० वर्षांची शिक्षा—मुंबई गुन्हे शाखेच्या या कारवाईला न्यायालयीन स्तरावरही यश मिळाले आहे.