आयआयटी बॉम्बे विद्यार्थी मृत्यू प्रकरण : मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; तपास आता गुन्हे शाखेकडे वर्ग!
विशेष रिपोर्ट: संदिप कसालकर
मुंबई: आयआयटी बॉम्बेचा (IIT Bombay) २० वर्षीय बी.टेक विद्यार्थी साहिल रवींद्र वाकोडे याच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात मुंबई पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य आणि वाढता तणाव पाहता, संपूर्ण प्रकरणाचा तपास पवई पोलिसांकडून थेट मुंबई क्राईम ब्रँचकडे (गुन्हे शाखा) सोपवण्यात आला आहे. गुन्हे शाखेने या प्रकरणी DCB CID C.R. No. 124/2026 अन्वये गुन्हा नोंदवून तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.
मुंबई पोलिसांच्या अधिकृत माहितीनुसार:
या हाय-प्रोफाइल प्रकरणाचा तपास थेट एसीपी (ACP) दर्जाच्या अधिकाऱ्याकडे सोपवण्यात आला आहे.
संपूर्ण तपास प्रक्रियेवर पोलीस उपआयुक्त (DCP Detection-I, गुन्हे शाखा) यांचे थेट नियंत्रण असणार आहे.
घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज, वर्गखोली ते वसतिगृहापर्यंतचा घटनाक्रम आणि विद्यार्थ्यांचे जबाब यांची सूक्ष्म पडताळणी गुन्हे शाखेकडून सुरू आहे.
"आरोपींना तत्काळ बेड्या ठोका!" — कुटुंबीयांचा पवईत ठिय्या आंदोलनाचा इशारा
दुसरीकडे, साहिलचे वडील रवींद्र वाकोडे यांनी आक्रमक भूमिका घेतली असून त्यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत:
"आमच्या मुलावर जातीय शेरेबाजी करून त्याचा मानसिक छळ करण्यात आला. एफआयआर (FIR) नोंदवूनही संबंधित प्राध्यापकासह इतर आरोपींवर अद्याप कोणतीही कारवाई का झाली नाही? त्यांना तात्काळ अटक करा. आम्ही शांततापूर्ण मार्गाने पवईत उपोषणाला बसणार आहोत; आम्हाला फक्त न्याय हवा आहे."
मुंबई पोलिसांचे नागरिकांना आवाहन
मुंबई पोलीस दलाने या संवेदनशील प्रकरणावर स्पष्टीकरण देताना म्हटले आहे:
तपास पूर्णपणे निष्पक्ष, पारदर्शक आणि सर्व कायदेशीर बाजू तपासून केला जात आहे.
सोशल मीडियावर कोणत्याही अफवा पसरवू नयेत किंवा तपासाआधी चुकीचे निष्कर्ष काढू नयेत.
केवळ अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा; पीडित कुटुंबाला पूर्ण न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस कटिबद्ध आहेत.